पाच हजारांसाठी आईवरच जीवघेणा हल्ला! पैसे देण्यास नकार देताच मुलाने केली मारहाण; डोक्यात वीट मारल्याने महिला जखमी! देऊळगाव राजा तालुक्यातील घटना....

 
देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अवघ्या पाच हजार रुपयांसाठी मुलानेच आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पिंपळगाव चिलमखा शिवरात घडली. खर्चासाठी मागितलेले पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्याने मुलाने आईला शिवीगाळ करत तिच्या डोक्यात वीट मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून तिच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कंगना लखन भोसले (रा. संजयनगर, देऊळगाव राजा) यांचा मुलगा रोहन लखन भोसले याने ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी पिंपळगाव चिलमखा शिवरात येथे त्यांच्याकडे खर्चासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली.मात्र, आपल्याकडे पैसे नसल्याचे कंगना यांनी सांगितल्यानंतर रोहनने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर तेथे पडलेली वीट उचलून त्यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला.

वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्हा दाखल

या घटनेनंतर कंगना भोसले यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीसोबत वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षकांच्या आदेशानुसार हेडकॉन्स्टेबल संजय गोर पुढील तपास करीत आहेत. तक्रारीतील आरोपांची सत्यता, घटनेची नेमकी पार्श्वभूमी आणि मारहाणीचे कारण याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, केवळ पाच हजार रुपयांच्या मागणीवरून झालेल्या या कथित हल्ल्याची चर्चा सुरू आहे.