पळसखेड चक्का येथे भीषण अपघात; मोटरसायकलस्वार ठार, एक गंभीर जखमी...

 
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सिंदखेडराजा ते मेहकर मार्गावरील पळसखेड चक्का येथील धोकादायक वळणावर असलेल्या कठडेहीन पुलावरून मोटरसायकल खोल खड्ड्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मुंबई-नागपूर महामार्गावर किनगाव राजाकडून सिंदखेडराजाच्या दिशेने येत असताना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश साळवे आणि दीपक उत्तम पिंपळे हे दोघे एमएच २८ एल ५०३९ क्रमांकाच्या मोटरसायकलने किनगाव राजाकडून सिंदखेडराजाच्या दिशेने येत होते. पळसखेड चक्का येथील तीव्र वळणावर आल्यानंतर मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले आणि कठडे नसलेल्या पुलावरून मोटरसायकल थेट खाली खोल खड्ड्यात कोसळली.

अपघाताची तीव्रता एवढी होती की, गणेश साळवे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोटरसायकलवर मागे बसलेले दीपक उत्तम पिंपळे हे गंभीर जखमी झाले. जखमी दीपक पिंपळे यांना तातडीने उपचारासाठी जालना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत गणेश साळवे आणि जखमी दीपक पिंपळे हे दोघेही चिंचोली जहागीर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.