चिखली तालुक्यातील अमोना येथे वीज पडून शेतकऱ्याची म्हैस दगावली; कुटुंब थोडक्यात बचावले
Updated: May 19, 2025, 08:46 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) तालुक्यातील अमोना येथील शेतकरी एकनाथ तुकाराम शिंदे यांच्या शेतात १८ मे रोजी दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास जोरदार पावसात वीज पडून त्यांची एक म्हैस जागीच मृत्युमुखी पडली. ही घटना त्यांच्या राहत्या घरापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर घडली असून सुदैवाने शिंदे कुटुंबीय थोडक्यात बचावले.
शिंदे हे आपल्या कुटुंबासह शेतामध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेतात गट नंबर १४४ मध्ये लिंबाच्या झाडाखाली म्हैस बांधलेली असताना अचानक वीज कोसळली. यात त्यांचे अंदाजे ८० ते ९० हजार रुपये किंमतीच्या म्हशीचा मृत्यू झाला. ही आर्थिक झळ शिंदे कुटुंबासाठी मोठी असून ते अल्पभूधारक शेतकरी आहेत.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होत असलेल्या जीवित व आर्थिक नुकसानीमुळे शेतकऱ्यांवरच्या संकटात सातत्याने वाढ होत आहे. शासनाने अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे आहे.