जानेफळात दिवसाढवळ्या शेतकऱ्याचे 35 हजार लंपास!SBI बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या दिगंबर जाधव यांना चोरट्यांचा डल्ला; प्रकार सीसीटीव्हीत कैद

 
 जानेफळ (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भारतीय स्टेट बँक, जानेफळ येथे मेहनतीचे पैसे भरण्यासाठी गेलेल्या शेतकरी दिगंबर जाधव यांचे तब्बल 35 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जानेफळ परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर जाधव हे आपली मेहनतीची कमाई असलेली रक्कम बँकेत भरण्यासाठी गेले होते. याचदरम्यान अज्ञात चोरट्यांनी संधी साधत त्यांच्याकडील 35 हजार रुपयांवर डल्ला मारला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार व्हिडिओग्राफी/सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाल्याची माहिती आहे.

या प्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी

जानेफळ हे पसरट वस्तीचे गाव असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकरी, व्यापारी तसेच गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी जानेफळ बसस्थानकासह महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणी जोर धरत आहे. जानेफळ पोलीस स्टेशन, भारतीय स्टेट बँक शाखा तसेच ग्रामपंचायत कार्यालयाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.