लोंबकळलेल्या तारेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू...
Nov 24, 2025, 12:39 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : डोणगावजवळील अंजनी बु. गावात २२ नोव्हेंबर रोजी शेतातील लोंबकळलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बाळकृष्ण राजाराम खोडवे (वय ६५, रा. अंजनी बु., ता. मेहकर) मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण राजाराम खोडवे हे त्यांच्या गट क्रमांक ५०८ मधील शेतात स्प्रिंकलरच्या पाईप व तोटी बदलण्याचे काम करत होते. यावेळी शेतात लोंबकळलेल्या विद्युत तारेचा त्यांच्या हाताला स्पर्श झाल्याने त्यांना तीव्र विद्युत धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतकाचे पुतणे रामेश्वर पांडुरंग खोडवे यांनी दिलेल्या तोंडी अहवालावरून डोणगाव पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संजय घिके करीत आहेत. दरम्यान, डोणगाव परिसरात विद्युत वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अनेक ठिकाणी वीजतारा लोंबकळणे, रोहित्रांवर फ्युज नसणे, तसेच विद्युत तारेखाली बांधकामे सुरू असणे असे धोकादायक प्रकार सातत्याने दिसून येत आहेत. त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.