सततची नापिकी,कर्जाच्या वाढत्या डोंगराला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; रायपूर येथील घटना...

 
 रायपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील ४३ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या शेतातील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. विजय किसन मुरडकर (वय ४३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
विजय मुरडकर यांच्याकडे अवघी दोन एकर शेती असून शेतीवरच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने त्यांच्यावर कर्जाचा भार वाढत गेला. बँकेचे कर्ज कसे फेडावे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेतून त्यांनी मंगळवारी (दि. ३ फेब्रुवारी) आपल्या शेतातील तीन पत्र्याच्या शेडमध्ये दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृतकावर सेंट्रल बँक, शाखा रायपूर यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज फेडणे अशक्य होत असल्याच्या तणावातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुभाष घेवंदे व आशिष काकडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. परमेश्वर मुरडकर यांच्या फिर्यादीवरून रायपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृतकाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने मुरडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.