शेतीचा वाद.! स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्यांनी केला जादूटोणा? बांधावर पिठाच्या उंड्याचं बाहुल अन् चहू बाजूला कापलेले लिंबू, हळद कुंकू!

सेवानिवृत्त लाचखोर ग्रामसेवक आणि शिक्षकावर महिलेच्या विनयभंगाचा आरोप..! नको ते केलं! रोहडा शिवारातील घटना

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील रोहडा शिवारातील शेतात वास्तव्यास असलेल्या एका महिलेने विनयभंग झाल्याची तक्रार दिली आहे.पीडित महिलेचे वय ३५ वर्षांचे आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार शेतीच्या वादातून झाला. विनयभंगाची घटना होण्याआधी दोन कुटुंबातील वाद हा कोलारा गावातील सरपंच, पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या मध्यस्थीने मिटला होता..मात्र त्याच दिवशी सायंकाळी पुन्हा हा वाद उफाळून आला..या घटनेला काळ्या जादूची किनार असल्याचेही समोर आले आहे. एक आरोपी सेवानिवृत्त ग्रामसेवक आहे. बुलढाण्यात ३१ जानेवारी २०२३ ला १ साखरेच पोत आणि १ लाख रोख लाचेची मागणी करणारा ग्रामसेवक एसीबीने पकडला होता.. तो लाचखोर रामकृष्ण गुलाबराव पवार हाच..! दुसऱ्या आरोपीचे नाव रमेश गुलाबराव पवार असून तो शिक्षक म्हणून नोकरी करतो.

 

याप्रकरणी कोलारा येथील ३५ वर्षीय महिलेने अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार पीडित महिला कुटुंबासह गेल्या ४० वर्षांपासून रोहडा शिवारातील शेतात राहते. त्यांच्या शेताशेजारीच संगीता रामकृष्ण पवार यांचे शेत आहे. पीडित महिला आणि पवार यांच्यात  शेतरस्त्यावरून वाद आहे. पीडित महिलेले तक्रारीत म्हटले आहे या शेत रस्त्याच्या वादावरून रामकृष्ण पवार हे सातत्याने शिवीगाळ करत असतात. दरम्यान दिनांक ११ जूनच्या दुपारी साडेचार वाजता कोलारा गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला होता..

 

  तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार वाद मिटविल्यानंतर त्यांना शेतातील धुर्‍यावर पिठाच्या उंड्याचं बाहुल, कापलेले लिंबू आणि हळद कुंकू दिसून आले. हा आरोपींकडून होत असलेल्या जादूटोण्याचा प्रकार असल्याचे तक्रारदार महिलेचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दरम्यान ११ जूनच्या सायंकाळी ७ वाजता पीडित महिला घरी एकटी असताना रामकृष्ण पवार आणि त्याचा भाऊ रमेश पवार यांनी तिथे येऊन शिवीगाळ केली.  रामकृष्ण पवार यांनी वाईट उद्देशाने पीडित महिलेचा हात धरत शेताकडे नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याचवेळी त्याचा भाऊ रमेश पवार यानेही महिलेच्या नको तिथे वाईट उद्देशाने हात लावल्याचे महिलेचे म्हणणे आहे. या प्रकारानंतर महिलेने आरडा ओरड केली, त्यामुळे पीडित महिलेचा पुतण्या आणि पुतण्याची पत्नी तिथे आले. दोघांनी महिलेला पवार भावांच्या तावडीतून वाचवले. त्यावेळी पुतण्याला देखील शिवीगाळ करून जीवाने मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. या झटापटीत रामकृष्ण पवार यांच्या पत्नीने देखील पीडित महिलेच्या पुतण्याच्या पत्नीला लोटपोट करून अश्लील शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेच्या दिवशी रात्री उशीर झाल्यामुळे काल १२ जूनला याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सेवानिवृत्त लाचखोर ग्रामसेवक रामकृष्ण गुलाबराव पवार, शिक्षक रमेश गुलाबराव पवार व संगीता रामकृष्ण पवार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रकरणाचा तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत पोफळे करीत आहेत.

 

कठोर कारवाईची मागणी..

या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला रामकृष्ण पवार याच्यावर २०२३ मध्ये  लाचखोरीचा गुन्हा दाखल आहे. एक साखरेच पोत आणि ४ लाख रुपये कॅश मागितल्याचे प्रकरण त्यावेळी चांगलेच गाजले होते. ३१ जानेवारी २०२३ ला बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील नागरे  यांच्या बंगल्यासमोर तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रामकृष्ण पवार याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती. दुसरा आरोपी पेशाने शिक्षक आहे. दोन्ही आरोपी तसे शिक्षित असताना त्यांच्याकडून जर जादूटोणा सारखा प्रकार होत असेल तर गंभीर आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार महिलेने केली आहे.