अंढेऱ्यात शेतीचा वाद! सख्खे भाऊ झाले पक्के वैरी...भावाच्या डोक्यात घातली लोखंडी पास...

 
 अंढेरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दरवर्षी पेरणीच्या हंगामाची तयारी सुरू झाली की शेतीचे वाद समोर येतात. कधी बांधाचा वाद, कधी शेत रस्त्याचा वाद, शेतातील झाडांच्या मालकीचा वाद... या वादातून प्रकरण हाणामारी पर्यंत जाते..कधी कधी अशा प्रकरणात जीवितहानी देखील झाल्याची उदाहरणे आहेत. देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अंढेरा शिवारात शेतीच्या मोजणीवरून दोन सख्ख्या भावांमधील वाद विकोपाला गेला..दोन भाऊ एकमेकांच्या जीवावर उठले..एकाने दुसऱ्याच्या डोक्यात लोखंडी पास मारून जखमी केले.

अंढेरा येथील रहिवासी दामोदर अर्जुन सानप आणि अशोक अर्जुन सानप या दोघांची गाव शिवारात शेती आहे. मात्र मोजणीवरून दोघांच्या मध्ये वाद सुरू आहे. दरम्यान दामोदर सानप हे शेतात हजर असतांना भाऊ अशोक अर्जुन सानप ट्रॅक्टर घेऊन नांगरणी करण्यासाठी शेतात आले. शेताची नांगरणी सुरू असताना शेतमोजणी झाल्याशिवाय धुर्‍याजवळ नांगरणी करू नको असे दामोदर सानप यांनी भाऊ अशोकला म्हटल्यावर दोघांमध्ये वाद वाढला.

अशोक सानप याने शिवीगाळ करून हातावर दगड व डोक्यामध्ये लोखंडी पास मारून मारहाण केल्याचा आरोप दामोदर सानप यांनी तक्रारीत केला आहे. यावेळी दामोदर सानप यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी आली असता तिला सुद्धा शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी अशोक अर्जुन सानप याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.