'कमी गुंतवणूक, प्रचंड नफा'च्या आमिषाला बळी; फेसबुकवरील एका क्लिकने शेतकऱ्याचे १०.७१ लाख रुपये गायब! बुलढाण्यात सायबर फसवणुकीचा मोठा धक्का'

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): "कमी गुंतवणूक करा आणि काही दिवसांत मोठा परतावा मिळवा," या आमिषाला बळी पडलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील एका शेतकऱ्याची तब्बल १० लाख ७१ हजार ४५३ रुपये २० पैसे इतकी सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फेसबुकवरील क्रिप्टोकरन्सी (USDT) गुंतवणुकीच्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर अज्ञात सायबर भामट्यांनी विश्वास संपादन करून विविध बँक खात्यांमध्ये लाखो रुपये भरायला लावल्याचे तक्रारीमध्ये नमूद आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, राजेश कुमार भीकमचंद केला (वय ६१, रा. सावरगाव, ता. जळगाव जामोद) हे शेतकरी असून त्यांचे एसबीआयच्या जळगाव जामोद शाखेत बचत खाते आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी फेसबुक वापरत असताना त्यांना क्रिप्टोकरन्सी (USDT) गुंतवणुकीची जाहिरात दिसली. कमी गुंतवणुकीत भरघोस नफा मिळेल, असे आमिष दाखविल्याने त्यांनी जाहिरातीवरील लिंकवर क्लिक केले. त्यानंतर परदेशी क्रमांकावरून व्हॉट्सॲपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. स्वतःचे नाव सुनील कुमार असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने क्रिप्टोमध्ये पैसे गुंतविल्यास मोठा परतावा मिळेल आणि नुकसान झाल्यास कंपनी भरपाई देईल, अशी खोटी हमी दिली. या आश्वासनांवर विश्वास ठेवून तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये पैसे पाठविण्यास सुरुवात केली.

तक्रारीनुसार, २६ जानेवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत त्यांनी यूपीआय आणि आरटीजीएसद्वारे Capital Small Finance Bank, State Bank of India, Bank of India, Bank of Maharashtra आणि Union Bank of India येथील विविध खात्यांमध्ये अनेक व्यवहार केले. अशा प्रकारे एकूण १०,७१,४५३.२० रुपये संबंधित खात्यांमध्ये जमा करण्यात आले.
मात्र, गुंतवणुकीवर कोणताही परतावा न मिळाल्याने आणि संपर्क करणाऱ्या व्यक्तीकडून टाळाटाळ सुरू झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी NCCRP (National Cyber Crime Reporting Portal) वर ऑनलाइन तक्रार नोंदवून सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित मोबाईल क्रमांक, बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

नागरिकांनी घ्यावी ही काळजी...

सायबर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर दिसणाऱ्या "कमी गुंतवणुकीत मोठा नफा", "क्रिप्टोमध्ये हमखास परतावा" अशा जाहिरातींना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीची पडताळणी करावी आणि संशयास्पद लिंक किंवा अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून पैसे पाठवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.