Exclusive गावगाड्याचे राजकारण लांबणीवर! १५,६३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर? एसआयआर प्रक्रियेचा फटका; नवी मतदार यादी आल्यानंतरच कार्यक्रमाची शक्यता...
राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे. प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण, आरक्षण सोडत, हरकती आणि त्यावरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रभाग आरक्षण अंतिम करण्यात आले आहे. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करून निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याची नियमित प्रक्रिया असते.
मात्र, राज्यभर सध्या सुरू असलेल्या एसआयआर (Special Intensive Revision) मोहिमेमुळे ही प्रक्रिया थांबण्याची शक्यता आहे. कारण या निवडणुकांसाठी अद्ययावत आणि सुधारित मतदार यादीच वापरण्याचा आग्रह प्रशासनाकडून धरण्यात येत आहे.
७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी
एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया साधारण एक ते दीड महिना चालण्याची अपेक्षा असल्याने नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत मतदार याद्या अंतिम होऊ शकतात. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम आणखी पुढे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नव्या मतदार यादीवर प्रशासनाचा भर
काही जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नव्याने तयार होणारी मतदार यादीच ग्राह्य धरण्याची मागणी केली आहे. एसआयआर प्रक्रियेद्वारे मयत, स्थलांतरित तसेच अपात्र मतदारांची नावे वगळली जाणार असल्याने अधिक अचूक आणि अद्ययावत मतदार यादीच्या आधारे निवडणुका घेण्याचा प्रशासनाचा आग्रह आहे.यामुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम आणखी काही महिने पुढे जाण्याची शक्यता असून, ग्रामीण भागातील राजकीय हालचालींनाही त्याचा मोठा परिणाम होणार आहे.