EXCLUSIVE घाम फोडणारी आकडेवारी..! जिल्ह्यात ५ महिन्यांत २३ खून , २२ हाफमर्डर! "त्या" दोघींच्या खुनाचा उलगडा अजुनही नाहीच; असेच झाले तर धोक्याची घंटा! पोलिसांवर दबाव आहे की नाही?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..वर हेडिंग मध्ये दिलेली आकडेवारी घाम फोडणारी आहेच शिवाय उरात धडकी भरवणारी देखील आहे. गेल्या ५ महिन्यात बुलडाणा जिल्हा तब्बल २३ खुनाच्या घटनांनी हादरला आहे. शिवाय २२ जणांचा गेम करण्याचा प्रयत्न अर्थात हाफ मर्डरचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. खुनाच्या गुन्ह्यातील वाढ २८ टक्के एवढी आहे.
   १ जानेवारी ते ३१ मे दरम्यानची ही आकडेवारी आहे. ५ महिन्यांत २३ खुनाच्या घटना घडल्या. यापैकी २१ प्रकरणाचा उलगडा करून आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मात्र २ प्रकरणांचा पोलिसांना छडा लावता आला नाही. जंग जंग पछाडून सुध्दा पोलिसांना २ खुनाच्या गुन्हांच्या उलगडा करता आला नाही. आरोपींच्या अटकेचे तर सोडाच "त्या" २ प्रकरणात मृतक तरुणींची ओळख देखील पटलेली नाही. दोन्ही गुन्हे एकाच पद्धतीने करण्यात आले आहेत.
अंढेरा आणि किनगावराजा हद्दीतील गुन्हे...
  ज्या दोन खुनाच्या गुन्ह्यांचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही त्यापैकी १ गुन्हा अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील तर दुसरा किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा २२ जानेवारी रोजी असोला शिवारातील राजवाडा ढाब्याजवळ उघडकीस आला होता. एका तरुणीचे प्रेत अर्धवट जळालेल्या आणि नग्नावस्थेत सापडले होते. तपासणीअंती तिच्यावर बलात्कार करून डोक्यात दगड टाकून नंतर गळा आवळून खून करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणात ५ महिने उलटून देखील मृतक तरुणीची ओळख पटली नाही. पोलिसांनी महाराष्ट्रभरातील बेपत्ता मुलीच्या पालकांशी संपर्क साधून "त्या" मृतक तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात पोलिसांना यश आले नाही. संबधित मृतक तरुणीच्या अज्ञात पालकांनी देखील स्वतःहून अद्याप पोलिसांशी संपर्क साधलेला नाही.
   दुसरी घटना किनगावराजा पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळगाव लेंडी शिवारात ३० मे रोजी उघडकीस आली होती. सिंदखेडराजा मेहकर रस्त्यावरील गायके धाब्याच्या पाठीमागे एका बंद ,पडीक खोलीजवळ अर्धवट जळलेल्या अवस्थेतील  महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेचे वय देखील अंदाजे २५ एवढेच होते. सदर महिलेचा अज्ञात मारेकर्‍यांनी अज्ञात ठिकाणी आधी गळा चिरून खून केला. महिलेच्या पायाच्या बोटाला ६ बोटे असल्याने ती बोटे देखील तोडण्याचा प्रयत्न अज्ञात मारेकऱ्यांनी केला..त्यानंतर मृतदेह गायके धाब्याजवळ आणून जाळण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी दोन्ही घटनांमध्ये मारेकऱ्यांनी मृतदेह जाळले. त्यामुळे दोन्ही घटनातील मृतक महिलांची ओळख अद्याप पटू शकली नाही त्यामुळे मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. या दोन्ही घटनांतील मारेकरी मोकाट असल्याने पोलिसांवरील दबाव वाढला आहे. अशा गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले नाही तर मारेकऱ्यांना मोकळे रान मिळू शकते शिवाय अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
   २२ हाफमर्डर...
जिल्ह्यात ५ महिन्यात विविध पोलीस ठाण्यात हाफ मर्डरचे २२ गुन्हे नोंद आहेत. २२ पैकी २२ प्रकरणांतील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . गेल्यावर्षीच्या तुलनेत हाफ मर्डरच्या घटना २२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते मे दरम्यान १८ खुनाच्या तर १८ हाफ मर्डरच्या घटना घडल्या होत्या.