EXCLUSIVE धक्कादायक! महाराष्ट्र हादरवून सोडणारी बातमी! राज्यात चालू ऑगस्ट महिन्यात २७३० मुली गायब झाल्या; कुठे गेल्या? कुणी नेल्या? काय झालं त्यांचं? बुलडाणा जिल्हाही मागे नाही....

 
बुलडाणा(अक्षय थिगळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय ही बातमी चिंता वाढवणारी आहे..समाजाची अन् पोलीस प्रशासनाची देखील..देशात कोलकत्ता आणि राज्यात बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांनंतर महिला सुरक्षा या विषयांवर वारंवार बोलले जात आहे.. त्यात गायब होणाऱ्या महिला आणि मुलींचा विषय देखील चिंताजनक आहे. महाराष्ट्रात गेल्या २९ दिवसांत म्हणजेच १ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या कालावधीत तब्बल २७३० मुली/ महिला गायब झाल्या आहेत. विशेष म्हणजे गायब होणाऱ्यांत सर्वाधिक प्रमाण हे १८ ते ३० या वयोगटातील आहेत. २७३० पैकी २०११ मुली/ महिला या १८ ते ३० या वयोगटातील आहेत.
मातृतीर्थ बुलडाणा जिल्हा देखील यात मागे नाही. १ जुलै ते आज २९ ऑगस्ट या जवळपास दोन महिन्यांच्या काळात तब्बल १२४ मुली आणि महिला गायब झाल्या आहेत..त्या कुठे गेल्या? कुणी नेल्या? त्यांचं काय झालं? या प्रश्नांचे उत्तर मिळालेलं नाही..राज्यात बेपत्ता झालेल्या मुलींचा २७३० हा आकडा सज्ञान मुलींचा आहे..त्यामुळे पोलीस याला फारसं गांभीर्याने घेत नाहीत..केवळ मीसिंग दाखल करून कायदेशीर औपचारिकता पूर्ण करायची अन् झालं..मात्र हा सामाजिक चिंतेचा विषय आहे...
महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अलीकडच्या २९ दिवसांत २७३० मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. राज्यातील विविध पोलीस ठाण्यात याबाबतच्या तक्रारी मुलींच्या कुटुंबीयांनी दिल्या आहेत. यापैकी किती मुली सापडल्या याची एकत्रित नोंद मात्र मिळू शकली नाही. काही मुली आणि महिला सापडल्या किंवा घरी परतल्या तरी त्याची माहिती कुटुंबीय पोलीस ठाण्याला कळवत नाहीत त्यामुळे सापडलेल्या मुलींची नोंद बऱ्याचदा पाहिजे त्या प्रमाणात नसते असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर 'बुलडाणा लाइव्ह" ला सांगितले.
कायदा काय सांगतो..?
कायद्याच्या दृष्टिकोनातून १८ वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या मुली किंवा मुले गायब होतात तेव्हा पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करतात. प्रकरणाचे गांभीर्य पाहून तातडीने तपास केला जातो. संबधित मुलगी ज्याने पळवून नेली असेल त्याला कठोर शिक्षा होते. मात्र १८ वर्षे वयापेक्षा अधिक वयाची मुलगी किंवा महिला गायब झाली असेल तर त्या प्रकरणाला फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. बऱ्याच प्रकरणात प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध असल्याने मुली घरून निघून जातात, तिकडे प्रियकरासोबत लग्न लावतात.ही बाब तिच्या कुटुंबियांना देखील माहीत असते मात्र तरीही मिसींगची तक्रार दिल्या जाते. प्रकरण आंतरजातीय विवाहाचे असेल तर मुलीचे तोंड देखील पहायचे नाही अशी भूमिका पालक घेतात त्यामुळे पोलीस डायरीवर त्या मुलीची नोंद वर्षानुवर्षे "मिसिंग"ची असते. याउलट काही प्रकरणात लग्नाच्या दोन-चार वर्षानंतर मुलीला स्वीकारले जाते मात्र मुलगी सापडली हे पोलीस स्टेशनला कळवले जात नाही त्यामुळे मिसिंग चा आकडा फुगलेला दिसतो.
विवाहित महिलाही होतात गायब...
बेपत्ता होणाऱ्यांमध्ये अविवाहित मुलींचे प्रमाण अधिक असले तरी विवाहित महिला देखील बेपत्ता होण्याची उदाहरणे आहेत. एकूण बेपत्ता झालेल्यांपैकी ३५ टक्के आकडा हा विवाहित महिलांचा आहे. घरात होणारे कौटुंबिक वाद आणि इतर कारणांमुळे विवाहित महिला घर सोडून जातात.काही प्रकरणांत तर लहान मुलांना घरी सोडून विवाहित महिला गायब होतात..
पालकांनी काळजी घेण्याची गरज..
मुलींच्या बेपत्ता होण्याची प्रमाण पाहता पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे. आपली मुले कुणाशी बोलतात, त्यांची संगत कशी आहे याविषयावर पालकांचे लक्ष पाहिजेच. विषय प्रेमप्रकरणाचा असेल तर पालकांनी देखील समजुतीने हा विषय सोडवला पाहिजे.मुलगा योग्य असेल तर स्वीकारायला हरकत नसावी...