EXCLUSIVE डोकं चक्रावून टाकणारी बातमी! जिल्ह्यातून दिवसाला २ मुली होतात गायब; कुठे जातात? कोण घेऊन जात? देव जाणे..! जूनच्या २२ दिवसांत ४८ मुली बेपत्ता...

 
बुलडाणा(अनंता काशीकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..हा आकडा धक्कादायक आहे. नुसताच धक्कादायक नाही समाजाची चिंता वाढवणारा आहे..पोलीस प्रशासनाला अलर्ट रहा अशी सूचना देणारा आहे..केवळ पोलिसांनाच नव्हे तर मुलींच्या माय - बापांना सुद्धा "ध्यान ठेवा" हे सांगणारा आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या २२ दिवसांत तब्बल ४८ जणी गायब झाल्या आहेत..अर्थात गायब होणे म्हणजे जादुटोण्याचा भाग नसून त्या घर सोडून निघून गेल्या आहेत..त्या कुठे गेल्यात? कुणासोबत गेल्यात याची मुलींच्या आई वडिलांना कोणतीही माहिती नाही..शोधून थकल्यानंतर मुलींच्या आई वडिलांना आता केवळ पोलिसांकडून मदतीची आशा आहे.
   मुली किंवा महिला बेपत्ता होण्याच्या प्रकरणात बुलडाणा जिल्हा मागे नाही. या घटना सातत्याने घडत आहेत. साधारणतः दरवर्षी दिवाळी नंतर लगीन सराई सुरू होण्याच्या आधीपासून या घटना वाढायला सुरूवात होते. बेपत्ता होणाऱ्या मुली १८ वर्षे वयापेक्षा अधिक म्हणजेच कायद्याच्या दृष्टीने सज्ञान असल्याने पोलीस अशा प्रकरणांत बेपत्ता होण्याची नोंद करतात. बहुतांश प्रकरणांत घरच्यांचा प्रेमविवाहाला विरोध असल्याने मुली प्रियकरासोबत जाण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पोलिसांना देखील अशा प्रकरणात काही करता येत नाही. मात्र १८ वर्षे वयापेक्षा कमी मुली जेव्हा बेपत्ता होतात तेव्हा पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेत अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. अशा मुलींचा शोध घेण्यासाठी पोलीस तातडीने पथके रवाना करतात. मे २०२४ मध्ये अशा अपहरणाच्या घटना घडल्या, त्यापैकी प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी तपास केला.
पालकांनो ध्यान ठेवा..
मुलींचे बेपत्ता होण्याचे हे प्रमाण समाजाची चिंता वाढवणारे आहे. काही प्रकरणांत तर लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरी गायब झाल्याच्या घटना घडल्यात तर काही मुली लग्न ठरल्यानंतर , साखरपुडा झाल्यानंतर, बस्ता फाडल्यानंतर,दागिने खरेदी केल्यावर गायब झाल्याची शेकडो उदाहरणे जिल्ह्यात आहेत. यामुळे मुलींच्या पालकांना मनस्ताप होते,सामाजिक बदनामीला देखील सामोरे जावे लागते. त्यामुळे वेळीच मुलांच्या प्रत्येक हालचालींवर , अभ्यासावर लक्ष ठेवणे कधीही चांगले..
मुलींनो माय - बापांचा चेहरा आठवा..
 लहानपासून सांभाळ करीत, शिक्षण करीत आई वडील मुलांना मोठे करतात..मात्र कधीकधी केवळ आकर्षणापाई मुली टुकार पोरांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसतात. मुलींना तो म्हणजे सर्वस्व वाटायला लागतो. आई वडिलांना देखील मुलीचे लग्न करायचेच असते पण फुलासारखे जपलेल्या लेकीचे सांसारिक जीवन सुखाचे व्हावे अशी मुलीच्या आईवडिलांची अपेक्षा असते,त्यात काय चूक? त्यामुळे मुलींनी जर स्वतःहून जोडीदार निवडलाच तर आईवडिलांना विश्वासात घेऊन त्याची कल्पना दिली पाहिजे..शेवटी आई वडील महत्वाचे आहेत ना..
विवाहिता देखील होतात गायब..
गायब होणाऱ्या महिला मुलींमध्ये अविवाहित आहेतच पण लग्न झालेल्या विवाहिता देखील गायब होण्याचे प्रमाण आहे. काही विवाहिता तर लहानग्या मुलांना सोडून गायब होतात. काही सासरकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून, शुल्लक भांडण झाल्याने तर काही अनैतिक संबंधातून गायब झाल्याची उदाहरणे आहेत.