Exclusive बाप्पो! बुलडाणा जिल्ह्यात १० महिन्यांत ५० मर्डर; ८२ जणांचा "गेम"करण्याचा प्रयत्न! १२३ बलात्कारांच्या घटनांनी जिल्हा हादरला! पोलिसांनी केलेल्या वसुलीचा आकडा कोटींच्या घरात...
Updated: Dec 30, 2025, 11:29 IST
बुलडाणा(अक्षय थिगळे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..हा आकडा घाम फोडणारा आहे, एवढेच नव्हे तर समाजाची चिंता वाढवणारा आहे..समाजात सातत्याने गुन्ह्यांची ,गुन्हेगारांची आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची संख्या वाढतेय. बुलडाणा जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या काळात तब्बल ५० जणांना रक्ताच्या थारोळ्यात पाडून त्यांचा जीव घेतल्या गेला..८२ जणांचा गेम करण्याचा प्रयत्न झाला,मात्र सुदैवाने ते जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले..१२३ प्रकरणांत आयाबहिणींवर बलात्कार झाल्याची नोंद जिल्ह्याच्या विविध पोलिस ठाण्यात झालेली आहे.. अर्थात या वाढत्या गुन्ह्यांत पोलिसांना दोष देऊन फायदा नाही..पोलिसांनी त्यांचे काम केलेच..मात्र खरी गरज आहे ती समाज व्यवस्थेने चिंतन करण्याची..गुन्हेगारांना डोक्यावर घेऊन मिरवण्याचा, डॉन म्हणून, भाई म्हणून संबोधण्याचा जो ट्रेंड वाढलाय त्यातूनच हे सगळं घडतंय..कुटुंब व्यवस्थेत "संस्कार" हा मुद्दा हल्ली गौण झालाय, मुलांनी जे शिकायचं ते शाळा कॉलेजमधून अन् दिवसाला मिळणाऱ्या टू जीबी डेटामधून.. त्यामुळेच सगळा घोळ झालाय.. अन् शेवटी समाज पोलिसांना दोष द्यायला मोकळा! गुन्हा घडल्यानंतर पोलिस आरोपींना पकडतील, कायद्याने शिक्षाही होईल.. पण गुन्हाच घडू नये ही जबाबदारी खऱ्या अर्थाने आहे ती समाजव्यवस्थेचीच..!
बुलडाणा जिल्हा जानेवारी ते ऑक्टोबर या काळात ५० खुनांच्या घटनांनी हादरला. ८२ प्रकरणे जिंदगीतून बाद करण्याचा प्रयत्न झाल्याची आहेत. सगळ्यात चिंतनीय बाब ही की १२३ प्रकरणे महिलांवरील अत्याचाराची आहेत. ३६१ प्रकरणे विनयभंगाची आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर या काळात एकूण ४ हजार ७९२ गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा ८ टक्क्यांनी कमी वाटत असला तरी गंभीर गुन्ह्यांची वाढती संख्या हा चिंतेचा मुद्दा आहे. गुन्ह्याच्या तपासा संदर्भात पोलिसांची कामगिरी समाधानकारक आहे. एकूण ७९ टक्के गुन्ह्यांचा यशस्वी तपास एसपी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केला आहे. गेल्यावर्षी तपासाची टक्केवारी ७७ टक्के होती.
१८ कोटी गेले, साडेनऊ कोटी वसूल केले...
गेल्यावर्षीच्या तुलनेने दरोड्यांचे ,चोरीचे गुन्हे कमी झाले आहेत. दरोडा, चोरी, जबरी चोरी अशा घटनांत एकूण १८ कोटी ९ लाख ५२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला..त्यापैकी ९ कोटी ४५ लाख ३७ हजार ६८० रुपयांच्या मुद्देमालाची वसुली करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरी, दरोडा अशा एकूण ८४४ पैकी ३१४ प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केला आहे.
अपहरणाच्या १४३ घटना..
दहा महिन्यांत जिल्ह्यात १४३ अपहरणाच्या घटनांची नोंद आहे. त्यापैकी १२६ प्रकरणांचा यशस्वी तपास करण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या घटना कमी दिसत असल्या तरी चिंतनीय आहे. बहुतांश अपहरणाच्या घटना या प्रेम प्रकरणातून समोर आले आहेत. प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलगी प्रियकरा सोबत निघून जाते अशा प्रकरणात कायद्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल होतो.