अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत जनावरेही सुरक्षित नाहीत! देऊळगाव घुबे शिवारात बैलांची चोरी! शेतकरी चिंतेत

 
देऊळगाव घुबे(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे शिवारात गोठ्यातून दोन बैलं चोरीला गेल्याची घटना काल, ४ फेब्रुवारीला सकाळी उघडकीस आली. मलगी रोड भागात संतोष विश्वनाथ घुबे यांच्या गोठ्यातील गुरांची चोरी झाली आहे.
   याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल सकाळीच गोठ्यातील बैलांना चारा पाणी देण्यासाठी संतोष घुबे गेले असता अचानकपणे दोन बैलं दिसले नाहीत, त्यामुळे त्यांना धक्काच बसला. देऊळगाव घुबे गावापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर गुरांचा गोठं आहे. मागील वर्षी सुद्धा असाच एक प्रकार घडून गेल्याचे परिसरातील शेतकरी सांगतात. काल मध्यरात्री २-४ वाजेच्या सुमारास घटना घडली असल्याचा शेतकऱ्यांना अंदाज आहे. उपरोक्त ठिकाण अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येतो. मागील काही दिवसांपासून चोरट्यांच्या सुळसुळाट या भागात दिसून येत आहे. त्याबरोबरच चोरीच्या गजब घटना समोर आल्या आहेत. त्यापैकीच काल झालेली एक घटना आहे.