“भाईगिरीचा शेवट: शेगाव पोलिसांनी ‘दादा’ लोकांची शहरभर धिंड काढली!”
तरुणाला मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न अंगलट...
Oct 13, 2025, 09:46 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :शहरात ‘भाईगिरी’च्या जोरावर दहशत माजविणाऱ्या टोळीवर शेगाव पोलिसांनी धडक कारवाई केली. चारचाकीत डांबून एका तरुणाला लाकडी काठी व पट्ट्याने बेदम मारहाण करणाऱ्या स्वयंघोषित दादा मंडळींची पोलिसांनी ११ ऑक्टोबर रोजी रात्री शहरातून धिंड काढली.
ही घटना ६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता जगदंबा चौक परिसरात घडली होती. पिडीत तरुणाच्या पत्नीने या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विशाल जाधव, प्रमोद जाधव, रोहन चौके, अक्षय चौके तसेच अन्य ३ ते ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
ताडी परिसरात या युवकांकडून ‘भाईगिरी’च्या नावाखाली दहशत पसरविली जात होती. वारंवार गुन्हे घडत असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही दहशत संपविण्यासाठी व नागरिकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने या आरोपींची पायी धिंड काढली.
या कारवाईमुळे शहरात चर्चेचा विषय निर्माण झाला असून पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.