बंद पडलेले पथदिवे सुरू करताना विजेचा धक्का; खासगी वायरमन गंभीर, संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील घटना..!
Sep 19, 2025, 12:39 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील बावनबीर येथे बंद पडलेले पथदिवे सुरू करीत असताना विजेचा धक्का बसल्याने खासगी वायरमन गंभीर जखमी झाले.ही घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. विजेचा धक्का एवढा जबर होता की खासगी वायरमन कलीम खान हे काही वेळ अक्षरशः खांबावरच लटकले होते.
स्थानिकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून तातडीने वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना शेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खाजगी लाईनमन म्हणून काम करणारे कलीम खान हे शासकीय लाईनमनच्या देखरेखीखाली ग्रामपंचायत अंतर्गत लाईट दुरुस्ती व इतर कामे करतात. बावनबीर येथील बंद पडलेल्या लाईटचे काम करताना त्यांना जबर धक्का बसला.
कलीम खान यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून खाजगी रुग्णालयातील उपचार खर्च पेलणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे महावितरण विभागाने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.