वीजबिल वसुलीचा पैसा लंपास? इसोलीतील लाईनमनवर ५.३९ लाखांच्या अपहाराचा आरोप; अमडापूर पोलिसांत गुन्हा; ग्राहाककडून वसुल केलेले पैसे कार्यालयात जमाच केले नाही...
Mar 6, 2026, 10:35 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील इसोली येथे वीज ग्राहकांकडून वसूल केलेली तब्बल ५ लाख ३९ हजार १२० रुपयांची वीजबिलाची रक्कम कार्यालयात जमा न करता परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे इसोलीसह अमडापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित लाईनमनविरोधात अमडापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणच्या अमडापूर विभागांतर्गत कार्यरत असलेले लाईनमन राम बद्रीनाथ बराटे यांच्याकडे ३ जून २०२५ पासून इसोली गावाच्या कार्यक्षेत्राचा पदभार देण्यात आला होता. त्यानंतर ३ जून ते १३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत त्यांनी गावातील सुमारे ८० ते ८५ वीज ग्राहकांकडून थकीत वीजबिलापोटी ५ लाख ३९ हजार १२० रुपयांची रक्कम वसूल केली. मात्र ही रक्कम कार्यालयात जमा करण्यात आली नसल्याचे विभागीय पडताळणीत उघड झाले.
या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर महावितरणचे सहायक अभियंता जयंत सुभाष गोलाइत यांनी अमडापूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, बराटे यांनी ग्राहकांकडून वसूल केलेली लाखो रुपयांची रक्कम कार्यालयात जमा न करता अपहार केला असून त्यामुळे महावितरणच्या महसुलावर परिणाम झाला आहे. तसेच ग्राहकांकडून कार्यालयात वारंवार चौकशी होत असून वीजसेवा सुरळीत ठेवण्यासाठी विभागाला पर्यायी व्यवस्था करावी लागत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी आरोपी लाईनमन राम बराटे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३१८ (४) व ३१६ (५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे इसोली व अमडापूर परिसरातील वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संबंधितावर कठोर कारवाई करून ग्राहकांची रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.