बसमध्ये चढत असताना वृद्ध महिलेची साेनसाखळी केली लंपास; शेगाव बस स्थानकावरील घटना; अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...
Oct 27, 2025, 10:33 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बसमध्ये माेठ्या प्रमाणात गर्दी वाढली असून अकाेला येथे येत असलेल्या एक वृद्ध महिलेच्या गळ्यातील साेनसाखळी अज्ञात चाेरट्याने लंपास केली. ही घटना २५ ऑक्टाेबर राेजी शेगाव बस स्थानकावर घडली. बस सुरू झाल्यानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर महिलेने अकाेल्यातील सिव्हील लाईन पाेलिसात तक्रार दिली. सिव्हील लाईन पाेलिसांनी हे प्रकरण शेगाव पाेलिसांकडे वर्ग केले आहे.
संध्या रवींद्र कुलकर्णी (६५, रा. पुसद, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या नातेवाइकांसह दर्शनाकरिता शेगावात आल्या होत्या. दर्शनानंतर अकोला येथे परत जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील ३३ ग्रॅम वजनाची, अंदाजे एक लाख रुपये किमतीची सोनसाखळी अज्ञात चाेरट्याने लंपास केली. बस सुरू झाल्यानंतर गळ्यातील सोनसाखळी नसल्याचे त्यांना लक्षात आले. गर्दी व वयोमानामुळे त्वरित कारवाई करता आली नाही. याबाबत त्यांनी अकोला सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, हे प्रकरण शेगाव शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. घटनेचा तपास पोलिस कर्मचारी श्याम आघाव करीत आहेत.