सततच्या नापिकीमुळे आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या...
Dec 30, 2025, 14:48 IST
मलकापूर पांग्रा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे २९ डिसेंबर सकाळच्या सुमारास बाबुराव श्रीराम देशमुख (वय ६१) वृद्ध शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सततच्या नापिकीमुळे आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून मलकापूर पांग्रा येथील वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मागील काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पीक पूर्णतः नष्ट झाले. त्यामुळे नापिकी आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे बाबुराव देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. नेहमीप्रमाणे शेतातील मोटर चालू करण्यासाठी ते शेतात गेले असता, उंबराच्या झाडाला पिवळ्या नायलॉन दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी “आमचा कोणावरही संशय नाही,” अशी फिर्याद अमोल संजयराव देशमुख यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या घटनेचा तपास साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार निवृत्ती पोफळे हे करीत आहेत.या घटनेमुळे मलकापूर पांग्रा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.