बनावट ओळखपत्रांद्वारे सवलती लाटणाऱ्याविरुध्द धडक मोहिम; ८० प्रवाशांवर कारवाई; परिवहन महामंडळाचा ‘पंचसुत्री’ कार्यक्रम यशस्वी; बोगस कार्ड जप्त केल्याने प्रवाशांचे धाबे दणाणले...
Dec 8, 2025, 14:18 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बनावट
कागदपत्रांच्या आधारे एसटी महामंडळाच्या प्रवासातील सवलती लाटणाऱ्या तब्बल ८० प्रवाशांवर राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाणा आगाराने विशेष मोहिम राबवत धडक कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात बनावट ओळखपत्रे जप्त झाल्याने बोगस ओळखपत्रांच्या जोरावर प्रवास करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
एसटी महामंडळाच्या बुलढाणा विभागाने महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी विशेष ‘पंचसुत्री’ कार्यक्रम हाती घेतला आहे. विभाग नियंत्रण अधिकारी शुभांगी सिरसाठ आणि विभागीय वाहतूक अधिकारी दिगांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, बुलढाणा बसस्थानक प्रमुख रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही विशेष मोहीम तीव्र केली आहे.
या कार्यक्रमांतर्गत बसेसची तपासणी करणे, प्रवाशांना योग्य त्या सवलती मिळवून देणे, बसेस वेळेवर सोडणे, तसेच प्रत्येक मार्गावर अचानक तपासणी करून बोगस कार्ड जप्त करणे यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. या कारवाईमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचे होणारे नुकसान टळण्यास मदत होणार असून गरजू आणि पात्र प्रवाशांना सवलतीचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळणार आहे.
५ दिवसांत ८० प्रवाशांवर कारवाई
‘पंचसुत्री’ मोहिमेअंतर्गत पथकाने मागील पाच दिवसांत बुलढाणा विभागातील विविध आगारांमध्ये तपासणी करून जवळपास ८० प्रवाशांची बनावट ओळखपत्रे जप्त करण्याची महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.
जप्त करण्यात आलेली बनावट ओळखपत्रे विभागीय कार्यालयात जमा केली जाणार असून, वरिष्ठांच्या आदेशानुसार ती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सोपवली जातील. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित प्रवाशांवर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे.
“बनावट ओळखपत्रांचा वापर करू नये. त्यामुळे शासनाची फसवणूक होते, एसटीच्या उत्पन्नात घट होते आणि योग्य प्रवाशांना सेवा देण्यास अडचणी निर्माण होतात. अशा व्यक्तींवर यापुढेही कारवाई सुरूच राहील,”
— रामकृष्ण पवार, बसस्थानक प्रमुख, बुलढाणा