रेल्वे पुलावर रील काढणे बेतले जीवावर; पिंपळगाव राजा येथील युवक ठार एक गंभीर आळसणा गावाजवळ रील काढत असताना ट्रेनने दिली धडक...
  Oct 31, 2025, 11:16 IST 
                                 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : समाजमाध्यमावर रिल काढण्याचा युवकांमध्ये ट्रेंड वाढला आहे. पिंपळगाव राजा येथील युवकाला रेल्वे पुलावर रील काढणे जीवावर बेतले आहे.
 कानात हेडफाेन असल्याने ट्रेनचा आवाजच आला नाही. त्यामुळे, समीर रफिक शेख (२०) याचा मृत्यू झाला तर त्याचा नातेवाईक शाकीर शेख गंभीर जखमी झाला.ही घटना २९ ऑक्टाेबर राेजी आळसणा येथील रेल्वे पुलावर घडली.  
   समीर रफिक शेख व शाकीर शेख हे आळसणा येथे लग्नासाठी आले हाेते. दरम्यान, रेल्वे पुलावरून जाताना त्यांनी मोबाइलवर रील तयार करण्याच्या मोहात रेल्वे रुळावर बसून व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी कानामध्ये हेडफोन असल्याने येणाऱ्या ट्रेनचा आवाज त्यांना ऐकू आला नाही.  
   अचानक आलेल्या ट्रेनने दोघांना धडक दिली. 
  यात समीर शेखचा जागीच मृत्यू झाला, तर शाकीर शेख गंभीर जखमी झाला. 
  घटनेची माहिती मिळताच शेगाव रेल्वे पोलिस सुरक्षा बलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी युवकास तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.