भरधाव दुचाकीसमाेर कुत्रा आल्याने अपघात; अंजनी बु येथील महिलेचा मृत्यू; वाशिम जिल्ह्यातील पिंप्री सरहद्द येथे घडला अपघात!
Aug 13, 2025, 15:33 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव दुचाकीसमाेर अचानक कुत्रा आल्याने झालेल्या अपघातात अंजनी बु येथील ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना वाशिम जिल्ह्यातील पिंप्री सरहद्द येथे १२ ऑगस्ट राेजी घडली. दुर्गाबाई परमेश्वर पद्मने असे मृतक महिलेचे नाव आहे.
अंजनी बु येथील दुर्गाबाई पद्मने या १२ ऑगस्ट रोजी सकाळी पती परमेश्वर पद्मने यांच्यासह वाशिम येथे मुलीला भेटण्यासाठी निघाल्या होत्या. मुंबई-नागपूर राज्य महामार्गावर पिंपरी सरहद्द गावाजवळ उतावळी नदीच्या जवळ त्यांच्या दुचाकीसमाेर अचानक कुत्रा आला. त्यांच्या पतीने अचानक ब्रेक लावल्याने मागे बसलेल्या दुर्गाबाई रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांच्या डाेक्याला जबर मार लागल्याने त्यांना मेहकर येथील रुग्णालयात तेथून छत्रपती संभाजी नगर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुलीला भेटण्यापूर्वीच आईचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.