वयाच्या पंधराव्या वर्षी कुणी मुलीचं लग्न करतं का? पण ते लावणार होते; त्याआधीच पोलिसांनी रोखले! किन्ही पवारमध्ये वेळेवर हस्तक्षेप, पालकांवर कारवाई
May 5, 2026, 10:47 IST
देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील किन्ही पवार येथे होऊ घातलेला अल्पवयीन मुलीचा बालविवाह देऊळगाव राजा पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत हाणून पाडला. सीसीटीएनएस प्रणालीवर प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत ही घटना रोखण्यात यश मिळविले.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ वर्षांखालील मुलीचा विवाह ३ मे रोजी होणार असल्याची माहिती पोलिसांना २ मे रोजी मिळाली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक रवाना केले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
पोलिसांनी किन्ही पवार येथे पोहोचून माहितीची पडताळणी केली असता संबंधित मुलगी (वय १५ वर्षे ६ महिने) ही आपल्या पालकांसोबत आढळली. त्या ठिकाणी विवाहपूर्व विधी सुरू असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत बालविवाह रोखला. यानंतर संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी, पोउपनि राजकुमार मोहोळकर, मपोउपनि विकार पटेल, सहाय्यक फौजदार प्रमोद मुळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकिसन गिते, समाधान गिते, महिला पोलिस कॉन्स्टेबल शीतल नांदे तसेच चालक विजय दराडे यांनी सहभाग घेतला.
१८ वर्षांखालील मुली व २१ वर्षांखालील मुलांचे विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असून ‘बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६’ अंतर्गत कठोर कारवाईची तरतूद आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून योग्य वयानंतरच विवाहाचा विचार करावा, तसेच अशा घटनांची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक गिरी यांनी केले आहे.