हुंड्यासाठी कुणी या थराला जात का? शेगावात विवाहितेचा छळ; पती व सासूविरुद्ध गुन्हा!
पाच लाखांची मागणी, मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्यांचा आरोप...

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती आणि सासूविरुद्ध शेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करत मारहाण, धमक्या व मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. पल्लवी राहुल दाणे (वय ३४, सध्या रा. ज्ञानेश्वरी नगर, अकोट रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राहुल काशिनाथ दाणे (वय ३९) व उषा काशिनाथ दाणे (वय ५७, दोघे रा. एन.एम. २२३, डब्ल्यु.सी.एल., शक्तीनगर, दुर्गापूर कॉलनी, चंद्रपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ८५, ११५(२), ३५१(२), ३(५) तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ चे कलम ३ व ४ अन्वये अप. क्रमांक २९७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी व आरोपी यांचा पुनर्विवाह झाला होता. लग्नानंतर सासूने “लग्नात कमी हुंडा व कमी सोनं दिलं” असे म्हणत वारंवार टोमणे मारून मानसिक त्रास दिला. तसेच माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत आरोपींनी छळ सुरू ठेवला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीने विरोध केल्यास आरोपींनी हात पिरगळणे, केस पकडून ओढणे, मारहाण करणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप आहे. उपचारासाठी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांना काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही आरोपींकडून देण्यात आल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
सततच्या छळामुळे व जीवाला धोका निर्माण झाल्याने आरोपींनी घराबाहेर काढल्यामुळे फिर्यादीला नाईलाजाने माहेरी राहावे लागत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ रामदास गट्टे करीत आहेत.