काळीज हेलावणारी घटना! क्रिकेट सट्टेबाजीत लाखो गमावल्याने आई रागावली; मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने आईचाही हार्ट अटॅक ने मृत्यू!

 
नागपूर(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): नागपूरातील छपरू नगर परिसरात काळीज हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. २० वर्षीय मुलाने आत्महत्या केल्यानंतर ४८ तासांच्या आत त्याच्या आईचाही हार्ट अटॅक ने मृत्यू झाला. सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीत तरुणाचे मोठे नुकसान झाल्याने त्याची आई त्याच्यावर रागावली होती. त्यामुळे तरुणाने आत्महत्या केली होती.

नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार २० वर्षीय खितेन वाघवानी या तरुणाला क्रिकेट सट्टा खेळण्याची सवय लागली होती. यात त्याचे मोठे नुकसान झाले, त्याच्या अभ्यासावर देखील परिणाम झाला होता. शुक्रवारी रात्री घराबाहेर पडलेला खितेन शनिवारी दुपारी ३ वाजता घरी परतला होता. जास्त वेळ बाहेर राहत असल्याने त्याची आई त्याच्यावर रागावली. त्यानंतर खितेन ची आई व इतर कुटुंबीय एका नातेवाईकाकडे लग्नाला गेले.

दरम्यान शनिवारच्या रात्री वाघवानी कुटुंब घरी परतले तेव्हा त्यांना स्वयंपाक घरात खितेन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला, त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेनंतर खितेनच्या आईने प्रचंड आक्रोश केला, तरुण मुलगा गेल्याचे दुःख असहनिय झाल्याने त्याच्या आईला हृदयविकाराचा धक्का आला. हितेनच्या मृत्यूच्या २४ तासांच्या आत त्याच्या आईनेही प्राण सोडले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.