शेतीच्या हद्दीवरून वाद, बाप-लेकावर लोखंडी रॉडने हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल !

 
अंढेरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतीच्या हद्दीच्या वादातून बाप-लेकावर लोखंडी रॉडने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना ११ ऑक्टोबर रोजी असोला बुद्रूक फाट्याजवळ घडली. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंढेरा पोलीस ठाणे हद्दीतील असोला बुद्रूक फाटा परिसरात मिनाबाई प्रल्हाद खेडेकर व त्यांचे पती आपल्या शेतात सोयाबीन सोंगत होते. त्याचवेळी आरोपी तेथे आले आणि सोयाबीन सोंगू लागले.
मिनाबाई यांच्या पतीने त्यांना विचारले की, “ही आमची शेती आहे, तुम्ही येथे सोयाबीन का सोंगत आहात?” — इतक्यात आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ व ढकलाढकली केली. त्यानंतर खेडेकर दांपत्य व त्यांचा मुलगा तक्रार नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्याकडे जात असताना आरोपींनी त्यांची गाडी अडवून लोखंडी रॉडने हल्ला केला.
या हल्ल्यात मिनाबाई यांच्या पतीच्या दोन्ही पायांवर गंभीर दुखापत झाली, तर मुलगा सोडविण्यास गेल्यावर त्यालाही लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी “आमच्या नादी लागू नका, नाहीतर जीवे मारू” अशी धमकीही दिली.
या प्रकरणी मिनाबाई प्रल्हाद खेडेकर (वय ५८, रा. अंत्री खेडेकर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १२६(२), ३५१(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंढेरा पोलिसांकडून सुरू आहे.