चंद्रग्रहणाच्या दिवशी लिंबू-बाहुलीच्या संशयावरून दोन कुटुंबांत वाद; परस्परविरोधी गुन्हे दाखल !

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जुन्या गावातील मिलिट्री प्लॉट परिसरात रविवारी चंद्रग्रहणाच्या दिवशी घरासमोर लिंबू-बाहुली टाकल्याच्या संशयावरून दोन कुटुंबांत वाद होऊन शिवीगाळ आणि मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात
शीतल विजय दुरणे (वय ३२, रा. मिलिट्री प्लॉट, जुना गाव) यांच्या तक्रारीवरून चंद्रकला शेवाळे (रा. भिलवाडा) आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, शेवाळे आपल्या मैत्रीण सुलताना यांच्या घरी जात असताना विजय दुरणे यांच्या घरासमोर त्यांच्या हातातील पर्स पडली. त्यातून मोबाइल आणि गॅसची पावती खाली पडली. ती उचलत असताना, विजय दुरणे यांच्या पत्नीने “घरासमोर जादूटोणा करतेस का?” असा सवाल करीत शिवीगाळ केली.
यानंतर झालेल्या वादात विजू दुरणे, त्यांची सासू व गणेश परसे यांनी मारहाण केली, असा आरोप शेवाळे यांनी केला आहे. दुसरीकडे, दुरणे कुटुंबीयांनीही मारहाणीची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे नोंदवले गेले आहेत.