BREKING गणेश विसर्जनात भाविक तलावात बुडाला! युद्धपातळीवर शोध; संग्रामपूर मधील दुर्घटना
Sep 29, 2023, 14:19 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गणेश विसर्जनासाठी गेलेला भाविक तलावात बुडाला असून त्याचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. जिल्हा पथकाने आज सकाळपासून शोध मोहिम सुरू केली असून बुडालेल्या इसमाचा अजूनही थांगपत्ता नाही.
संग्रामपूर तालुक्यातील शिवणी तलावात काल,गुरुवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली. लाडणापूर शिवारातील राहिवासी सिद्धार्थ प्रकाश खार्गे ( ४५) हे विसर्जनासाठी गेले असता पाण्यात बुडाले. स्थानिक प्रशासन, पोलीस पाटील, तलाठी यांनी रात्री उशिरापर्यंत सिध्दार्थचा शोध घेतला. मात्र अंधार व तलावात असलेल्या मोठ्या जलसाठ्या मुळे शोध घेण्यात अपयश आले.
दरम्यान आज शुक्रवारी सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र आज दुपारपर्यंत बुडालेल्या इसमाचा अजूनही शोध लागला नव्हता.