घरासाठी पैशांची मागणी; विवाहितेची पेनटाकळी धरणात उडी घेऊन आत्महत्या! 
पती, सासू, सासरा आणि दिराविरोधात गुन्हा दाखल; 

 
 हिवरा आश्रम (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घराच्या बांधकामासाठी माहेरून तीस हजार रुपये आणा, अशी मागणी करून पती, सासू, सासरा आणि दिराकडून सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने पेनटाकळी धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून चौघांना अटक केली आहे.
आशा किशोर गायकवाड (वय 27, रा. नायगाव खुर्द ता. चिखली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे पती किशोर शामराव गायकवाड, सासरे शामराव मारोती गायकवाड, सासू सखुबाई शामराव गायकवाड आणि दिर मधुकर शामराव गायकवाड हे सर्व एकत्र राहात होते. आशाला आठ वर्षांचा मुलगा स्वराज आणि तीन वर्षांची मुलगी काव्या आहे.
आशावर सासरच्या मंडळींकडून घर बांधण्यासाठी माहेरून तीस हजार रुपये आणण्याची मागणी केली जात होती. तसेच तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. या छळाला कंटाळून ७ जुलै रोजी आशाने पेनटाकळी धरणात उडी घेतली.
मृत महिलेचा भाऊ नितीन भीमराव अवसरमोल (वय २४, रा. नांद्रा धांडे, ता. मेहकर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती, सासू, सासरा व दिराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.