३० हजारांच्या वार्षिक लाचेची मागणी; सहायक वनसंरक्षक व लिपिक एसीबीच्या जाळ्यात; १५ हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात पकडले, बुलढाण्यात खळबळ
तक्रारदार हे शेतातील झाडांची खरेदी करून त्यांची कटाई, वाहतूक व लाकूड विक्री (आरामशीन व्यापाऱ्यांना) असा व्यवसाय करतात. या व्यवसायावर कोणतीही कारवाई होऊ नये व काम सुरळीत चालू राहावे, यासाठी सहायक वनसंरक्षक श्रीमती आपेट व त्यांचे कार्यालयातील बाबू अमोल मोरे यांनी ३०,००० रुपये वार्षिक हप्ता स्वरूपात लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा येथे प्राप्त झाली होती.
तडजोडीनंतर १५ हजारांचा पहिला हप्ता एसीबीने तक्रारीची दखल घेत ३१ डिसेंबर २०२५ रोजी लाच मागणी पडताळणी कार्यवाही राबवली. या दरम्यान सहायक वनसंरक्षक आपेट यांनी लाचेची मागणी कायम ठेवत १५,००० रुपये पहिला हप्ता स्वीकारण्यास संमती दिली. त्यानंतर सहायक वनसंरक्षक कार्यालय, राणी बगीचा, चिखली रोड, बुलढाणा येथे सापळा रचण्यात आला. या सापळ्यात कनिष्ठ लिपिक अमोल मोरे यांनी सहायक वनसंरक्षक आपेट यांच्या समक्ष, त्यांच्या दालनात तक्रारदाराकडून १५,००० रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी श्रीमती अश्विनी आपेट व अमोल मोरे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई बापू बांगर, पोलीस अधीक्षक, एसीबी अमरावती, सचिंद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी अमरावती, भागोजी चोरमले, पोलीस उपअधीक्षक, एसीबी बुलढाणा, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास गुसिंगे, सहायक फौजदार शाम भांगे व एसीबी बुलढाणा पथकाने यशस्वीपणे पार पाडली.