'Dear Mummy and Papa... मला माफ करा'; १४ वर्षीय मुलाची चिठ्ठी वाचून आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली! घरातून १० हजार घेऊन बेपत्ता; बुलढाणा शहरात खळबळ
तक्रारीनुसार, सरस्वती नगर येथे राहणारे प्राध्यापक रवीकुमार बापूराव शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांचा १४ वर्षे ५ महिने वयाचा मुलगा अरिहंत शिंदे हा बुलढाण्यातील एका इंटरनॅशनल शाळेत नववीत शिक्षण घेत आहे.
मंगळवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी प्राध्यापक शिंदे हे नोकरीवरून घरी परतले असता मुलगा अरिहंत घरात दिसला नाही. पत्नीने तो सायंकाळी चारच्या सुमारास बाहेर खेळायला गेल्याचे सांगितले. रात्री सात वाजेपर्यंत तो परत न आल्याने कुटुंबीयांनी मित्रांकडे तसेच परिसरात शोधाशोध केली. मात्र काहीच माहिती न मिळाल्याने रात्री घरी आल्यानंतर मुलाच्या शालेय पुस्तकांमध्ये एक हस्तलिखित चिठ्ठी आढळून आली.
त्या चिठ्ठीत अरिहंतने आई-वडिलांची माफी मागत, "Dear Mummy and Papa... मी अरिहंत शिंदे माफी मागतो. माझ्या चुका मला कधीच समजल्या नाहीत. आता वेळ निघून गेली आहे. मी शेवटचे १० हजार रुपये घेत आहे. काही वर्षांनी परत करेन, पण ५० हजार अजून एकदा माफ करा. मला शोधू नका. मला शोधलंत तरी मी निघून जाईन. पप्पा, मम्मीला रागावू नका... प्लीज सॉरी..." असा भावनिक मजकूर लिहिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
ही चिठ्ठी मिळाल्यानंतर मुलाने घरातून १० हजार रुपये घेतल्याचेही कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने बुलढाणा शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
पोलिसांनी शहरातील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सायंकाळी सुमारे ४.२८ वाजता अरिहंत हा तिरुपती चौक परिसरातून मोठ्या देवीकडे सायकलने जाताना दिसून आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
बेपत्ता मुलाचे वर्णन असे आहे –
रंग गोरा, उंची सुमारे ५ फूट ४ इंच, चेहरा लांबट, केस काळे व बारीक. अंगात काळ्या रंगाचा टी-शर्ट, लाल रंगाचे जॅकेट, काळ्या रंगाची पँट आणि पायात काळ्या रंगाच्या चप्पल होत्या.
या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत असून नागरिकांना संबंधित मुलाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने बुलढाणा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.