शेताच्या कंपाऊंडमध्ये सोडला करंट! शेतात निदंता निदंता लागला विजेचा धक्का! महिलेचा मृत्यू; खामगाव तालुक्यात हळहळ
Updated: Aug 3, 2026, 12:09 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील रोहणा शिवारातील गट क्रमांक २६२ मध्ये शेताभोवती लावलेल्या तार कंपाउंडमध्ये सोडण्यात आलेल्या विजेचा धक्का लागून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२ ऑगस्ट) रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत महिला दुर्गाबाई सोमनाथ टेळे (वय अंदाजे ३०, रा. रोहणा) या आपल्या कुटुंबासह मेंढीपालन व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होत्या. शनिवारी सकाळी त्या शेतात निंदणाचे काम करत असताना त्यांना धुऱ्यालगत लावलेल्या तार कंपाउंडचा विजेचा धक्का लागला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच फिर्यादी अंबादास बुधा टेळे (वय ४६, रा. लाखनवाडा, ता. खामगाव) यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा दुर्गाबाई टेळे यांना विजेचा धक्का लागलेल्या अवस्थेत मृत आढळून आल्या. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.