जुन्या वादातून राडा; तरुणाच्या डोक्यात दगड व खुर्चीने मारहाण, चार जणांविरोधात गुन्हा! चिखली तालुक्यातील खैरव येथील घटना...
Jun 18, 2025, 09:28 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जुन्या भांडणाच्या कारणावरून उफाळून आलेल्या वादात एकाच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी करण्यात आले असून, इतरांनीही मारहाण केल्याची घटना १६ जून रोजी खैरव येथे घडली. या प्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खैरव येथील रहिवासी कल्पना बारीकराव लहाने (वय ५१) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्यासोबत जुना वाद असलेल्या व्यक्तींनी वाद निर्माण करत शिवीगाळ केली. त्यांना शिवीगाळ करू नका असे सांगितले असता आरोपींनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, वाद सोडवण्यासाठी फिर्यादीचा मुलगा प्रदीप लहाने पुढे आला असता, प्रवीण पुंजाराम लहाने याने त्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. तसेच आरोपी आम्रपाली भीमराव साळवे आणि संध्या विलास झोटे यांनीही प्रदीपच्या डोक्यात खुर्ची मारून जखमी केले.
या घटनेनंतर कल्पना लहाने यांच्या तक्रारीवरून आरोपी सिंधू पुंजाराम लहाने, प्रवीण पुंजाराम लहाने, आम्रपाली भीमराव साळवे आणि संध्या विलास झोटे (सर्व रा. खैरव) यांच्याविरोधात अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.