CRIME STORY गाडीचा हफ्ता मागायला गेला अन् जीव गेला! फायनान्स कर्मचाऱ्याला फरशीने मारले....

 

लाइव्ह ग्रुप नेटवर्क 

घटना सोलापूर शहरातील आहे. स्पर्श फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लक्ष्मण जाधव असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच नाव आहे. गाडीच्या हफ्ता वसुलीसाठी तो गेला होता, त्यावेळी गाडीमालकासोबत वाद झाल्याने राडा झाला..

  प्राप्त माहितीनुसार लक्ष्मण जाधव हा स्पर्श फायनान्स कंपनीत नोकरीला होता. फायनान्स कंपनीने ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेल्या ग्राहकांची यादी त्याला देण्यात आली होती. हफ्ते न भरणाऱ्याची गाडी ओढून आणण्यासाठी तो त्याच्या ३ सहकाऱ्यांसह गेला होता. दुचाकी वाहन ताब्यात घेत असताना त्याला दुचाकी मालकासह चौघांनी जबर मारहाण केली.

 विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुरानी मस्जिद जवळ ही घटना घडली. दुचाकी मालकासह चौघांनी लक्ष्मणच्या डोक्यात फरशी आणि खोऱ्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मणला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, २३ सप्टेंबर पासून लक्ष्मण वर उपचार सुरू होते मात्र गुरुवारी रात्री मृत्यूशी झुंज संपली अन् लक्ष्मणचा मृत्यू झाला.
  लक्ष्मणच्या मृत्यूनंतर शासकीय रुग्णालयात मोठा जमाव जमला होता. आरोपींच्या अटकेची मागणी जमावाकडून करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त रुग्णालय परिसरात तैनात करण्यात आला होता. दरम्यान विजापूर नाका पोलिसांनी आरोपी अमर कांबळे(२६), विशाल राजू जाधव (२३),राजेश मदनावाले (३२) आणि अविनाश मदनावाले (२२) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.