CRIME STORY आधी नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत थाटला संसार; वर्षभरानंतर पुन्हा जुन्या नवऱ्याशी जुळले सूत अन् रचला खुनाचा कट!
प्रियकराला फिरायला घेऊन गेली, वाटेत आधीच्या नवऱ्याला बोलावले अन् दोघांनी मिळून संपवले! बुलढाणा जिल्ह्यातील थरारक लव्ह ट्रँगल मर्डर...
या घटनेची पार्श्वभूमी एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही मागे टाकणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोमल भोसले आणि अजय ऊर्फ गोट्या विजय पवार हे पूर्वी पती-पत्नी होते. त्यांचा संसार सुरू असतानाच कोमलचे टाकरखेड हेलगा येथील गोपाल ऊर्फ संजय मंजुळ पवार याच्याशी प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधातून कोमलने अजयला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या समाजातील प्रथेनुसार दोघांमध्ये फारकतही झाली. त्यानंतर कोमल गोपालसोबत राहू लागली. गेल्या वर्षभरापासून दोघेही पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते.
पुन्हा जुन्या नवऱ्याशी जुळले प्रेमाचे सूत!
गोपालसोबत संसार सुरू असतानाच कोमलच्या आयुष्यात पुन्हा तिचा आधीचा नवरा अजय आला. दोघांमधील दुरावा कमी झाला आणि पुन्हा प्रेमसंबंध सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे गोपालसोबत संसार आणि दुसरीकडे आधीच्या नवऱ्याशी पुन्हा सुरू झालेले प्रेमसंबंध, अशा विचित्र प्रेमाच्या त्रिकोणातून अखेर गोपालच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे.
प्रियकरासोबत दुचाकीवर निघाली; वाटेतच दबा धरून बसला आधीचा नवरा!
१५ नोव्हेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास गोपाल आणि कोमल हे दोघे मोटारसायकलवरून पांढरदेव येथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, या प्रवासादरम्यानच गोपालचा घात करण्याचे नियोजन आधीच करण्यात आल्याचा आरोप आहे.तक्रारीनुसार, कोमलने तिचा आधीचा नवरा अजय ऊर्फ गोट्या विजय पवार याला वाटेत बोलावून घेतले. कव्हळा ते महिमळ या कच्च्या रस्त्यावर दोघांनी मिळून गोपालवर चाकूने हल्ला केला. गोपालच्या छातीवर, पोटावर, गळ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर चाकूचे वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या गोपालचा जागीच मृत्यू झाला.
खून केल्यानंतर प्रेयसीनेच मृताच्या भावाला केला फोन!
या हत्याकांडातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे गोपालच्या मृत्यूची माहिती स्वतः कोमलनेच त्याच्या चुलत भावाला दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोमलने गोपालचा चुलत भाऊ मनोज आसाराम पवार याला फोन केला. या फोनवर तिने आपण आणि अजयने मिळून गोपालला चाकूने मारल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. तसेच गोपाल महिमळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेला असल्याची माहितीही तिने दिली.
हा फोन आल्यानंतर मनोज पवार आणि त्याचा चुलत भाऊ करण आसाराम पवार यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तेथे गोपाल रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला आढळला. त्याच्या शरीरावर चाकूच्या वारांच्या गंभीर जखमा होत्या. हे दृश्य पाहून नातेवाइकांना जबर धक्का बसला.
खुनानंतर दोघेही फरार; सायंकाळी पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
घटनेनंतर कोमल आणि अजय हे दोघेही पसार झाले होते. दरम्यान, मनोज पवार यांनी आमडापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सायंकाळी दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. प्रेमसंबंधातून घडलेल्या या हत्याकांडामागील नेमका घटनाक्रम, कटाची तयारी आणि इतर बाबींचा पोलीस तपास सुरू आहे.जिच्यासाठी आधीचा संसार मोडला, जिच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली, त्याच प्रेयसीवर आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप झाल्याने या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या प्रेमकहाणीचा असा रक्तरंजित शेवट झाल्याने टाकरखेड हेलगा परिसरात खळबळ उडाली आहे.