अवैध रेती वाहतुकीवर गुन्हे शाखेची धडक कारवाई; ८१ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; चार टिप्परसह रेतीही केली जप्त; चार रेती माफीयांविरुद्ध दाखल केला गुन्हा..!

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून रेतीचे उत्खनन करून वाहतुक सुरू आहे. अवैध आणि विनापरवाना गौण खनिज (रेती) वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने पाेलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात रेतीमाफीयांविरुद्ध विशेष माेहिम राबवली. तसेच चार रेती माफीयांवर कारवाई करीत त्यांच्याकडून चार टिप्पर, रेती असा तब्बल ८१ लाख रुपयांचा एवज जप्त केला आहे. 

जिल्ह्यातील विविध भागांतून बेकायदेशीर रेती वाहतुकीवर बंदोबस्त ठेवून चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.या पथकांनी मलकापूर शहर पोलीस ठाणे हद्दीत आरोपी ज्ञानेश्वर गणेश झांबरे (रा. मुर्ती, ता. मोताळा) याच्याकडून एक टिप्पर व रेती मिळून १५ लाख रुपयांचा एवज जप्त केला.तसेच शेगाव ग्रामीण हद्दीत आरोपी उमेश गजानन भोंगरे (रा. सावळी, ता. संग्रामपूर) याच्याकडून एक टिप्पर व रेती मिळून १५ लाख १० हजार रुपये किंमतीचा एवज जप्त केला.
चिखली पोलीस ठाणे हद्दीत आरोपी रामदास भास्कर परिहार (रा. चिखली) याच्याकडून ३५ लाख ५० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी शुभम गजानन झाल्टे (रा. देऊळगाव घुबे) याच्याकडून १५ लाख ३० हजार रुपयांचा एवज जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय दंड संहिता तसेच गौण खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये तर अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) व अमोल गायकवाड (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात पोनि. सुनिल अंबुलकर यांच्यासह पंकज सपकाळे, राजकुमार राजपूत, ओमप्रकाश सावळे, अनुप मेहेर, दिनेशकुमार बकाले, संजय भुजबळ, गजानन दराडे, जगदेव टेकाळे, दिगंबर कपाटे, मपोहेकॉ. बनिता शिंगणे, युवराज राठोड, अरविंद बडगे, जयंत बोचे, गणेश बाघ, विक्रांत इंगळे, निलेश राजपूत, वैभव मगर, दिपक वायाळ, समाधान टेकाळे व राहुल बोर्डे यांचा समावेश होता.यापुढेही रेती माफीयांविरुद्ध कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा पाेलिसांनी दिला आहे.