दुष्काळात कष्टाने पिकवलेला कापूस आगीत खाक! अज्ञात व्यक्तीने पेटवली कापसाची गंजी; शेतकऱ्याच्या सात लाखांच्या मेहनतीची झाली राख! मोताळा तालुक्यातील संतापजनक घटना...

 
मोताळा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आधीच दुष्काळाच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला असताना आता एका शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टाची अक्षरशः राख झाल्याची संतापजनक घटना मोताळा तालुक्यातील पुन्हई हनवतखेड शिवारात घडली आहे. शेतकरी उज्वल दिगंबर भंगाळे यांच्या शेतातील कापसाच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा प्रकार समोर आला असून, या आगीत कापसासह शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत तब्बल सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुष्काळाच्या झळा सोसत कष्टाने पिकवलेला कापूस डोळ्यांदेखत राख झाल्याने भंगाळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुन्हई येथील शेतकरी उज्वल दिगंबर भंगाळे यांनी आपल्या शेतातील खोलीत कापूस आणि शेतीसाठी लागणारे साहित्य ठेवले होते. २२ नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात व्यक्तीने या खोलीला आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आज, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी भंगाळे शेतात गेले असता त्यांना कापूस आणि शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्याचे दिसून आले. वर्षभर राबराब राबून पिकवलेला कापूस असा आगीत भस्मसात झाल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. यंदा पावसाअभावी आधीच शेतीचे गणित कोलमडले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करून हाती आलेले पीक विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, शेतीचा खर्च भागवायचा, अशी अपेक्षा असतानाच या आगीने शेतकऱ्याच्या आशांवर पाणी फेरले आहे.

कष्टाची राख करणारा कोण? कठोर कारवाईची मागणी!

शेतातील कापसाला आग लावण्यामागे नेमका कोणाचा हात आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेचा सखोल तपास करून संबंधित दोषींना तातडीने शोधून काढावे आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी उज्वल भंगाळे यांनी केली आहे. तसेच आगीत झालेल्या नुकसानीचा प्रशासनाने तातडीने पंचनामा करून शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. एकीकडे दुष्काळाने शेतीचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे अशा घटनेमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावला गेला आहे. आता या घटनेचा तपास कधी लागणार आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदतीचा हात कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.