इंस्टाग्रामवरील एका स्टोरीवरून पेटला वाद; १६ वर्षीय मुलासह वडिलांनाही जमावाकडून मारहाण केल्याचा आरोप! वडिलांचा मृत्यू झाल्याने मेहकरच्या भालेगावात खळबळ;

 माफी मागूनही जमावाचा संताप शमेना! २० जणांविरुद्ध गुन्हा, १५ जण पोलिसांच्या ताब्यात...

 
 मेहकर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : इंस्टाग्रामवर ठेवलेल्या एका स्टोरीवरून निर्माण झालेल्या वादाला मेहकर तालुक्यातील भालेगावात गंभीर वळण लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे छायाचित्र असलेली स्टोरी एका १६ वर्षीय मुलाने इंस्टाग्रामवर ठेवली होती. त्यावरून झालेल्या वादात संबंधित मुलासह त्याच्या वडिलांनाही जमावाने मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर वडील निलेश अशोकराव निकम यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, १५ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, निकम यांच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, भालेगाव येथील एका १६ वर्षीय मुलाने इंस्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे छायाचित्र असलेली स्टोरी ठेवली होती. या स्टोरीवरून काही तरुणांनी आक्षेप घेत मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे. वाद वाढू नये म्हणून मुलाच्या वडिलांनी माफी मागितली. मात्र, त्यानंतरही हा वाद मिटला नाही.

१० नोव्हेंबर रोजी दुपारी काही तरुणांनी मेहकर येथे मुलाच्या नातेवाइकांची भेट घेतली. यावेळी पुन्हा मुलाच्या वतीने माफी मागण्यात आली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी निकम शेतातून घरी येत असताना काही तरुण दुचाकींवरून निकम यांच्या घरासमोर आले. त्यांनी मुलाला पुन्हा माफी मागण्यास सांगितले. मुलगा माफी मागत असतानाच जमावातील काही जणांनी त्याला आणि त्याच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मारहाणीनंतर वडील बेशुद्ध; रुग्णालयात मृत घोषित!

या घटनेदरम्यान निलेश अशोकराव निकम बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने मेहकर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे निकम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा आरोप करण्यात येत असला, तरी त्याचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

२० जणांविरुद्ध गुन्हा; १५ जण ताब्यात!

या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेतील प्रत्येकाची भूमिका आणि मृत्यूचे नेमके कारण याबाबत पोलीस तपास करीत आहेत.एका इंस्टाग्राम स्टोरीवरून सुरू झालेला वाद माफी मागितल्यानंतरही मिटला नाही आणि त्यातून मुलासह वडिलांना मारहाण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला. त्यानंतर वडिलांचा मृत्यू झाल्याने या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. सोशल मीडियावरील वादातून कायदा हातात घेण्याच्या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत असून, पोलीस तपासातून नेमके काय सत्य समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.