बोरी - अडगावच्या पुलावर ठेकेदाराने खणला मृत्यूचा सापळा; ३९ वर्षीय शेतमजुराचा बळी - तरीही पोलीस गप्प!
पीडित कुटुंबाला न्याय मिळेना; अखेर पत्रकार सुधीर टिकार यांच्यासह पीडित कुटुंबाचे त्याच पुलावर आमरण उपोषण सुरु...
हा अपघात नाही, तर प्रशासनाने घडवून आणलेला खून आहे, असा संतप्त आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. नियमानुसार पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करणे बंधनकारक असताना ठेकेदाराने संपूर्ण उन्हाळाभर काम बंद ठेवले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर, जून २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात JCB च्या सहाय्याने रस्त्याच्या दोन्ही बाजू ३ ते ४ फूट खोल खोदून तशाच उघड्या ठेवल्या. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, त्या ठिकाणी ना 'काम सुरू आहे' चा बोर्ड, ना बॅरिकेड, ना रेडियम पट्टी, ना स्पीड ब्रेकर २९ जून २०२६ रोजी सायंकाळी सोना सोनवणे दुचाकीने जात असताना अंधारात खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह थेट खड्ड्यात कोसळले आणि डोक्याला गंभीर मार लागून जागीच ठार झाले. या मुर्दाड व्यवस्थेविरोधात आता पीडित कुटुंबाने एल्गार पुकारला आहे. न्याय मिळत नसल्याने नाईलाजास्तव १५ सप्टेंबर, मंगळवारपासून पत्रकार सुधीर विश्वासराव टिकार यांच्यासह पीडित जगन काशिराम सोनवणे यांनी त्याच अपघातग्रस्त बोरी अडगावच्या पुलावर आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणानंतर होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी पोलीस आणि सा.बां. विभागाची राहील, असा लेखी इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती अधीक्षक अभियंता सा.बां. मंडळ अकोला, उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव, उपविभागीय अभियंता खामगाव यांना देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर ग्रामज्योतीचे संपादक सुधीर टिकार यांनी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. १० जुलै २०२६ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलढाणा आणि कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग खामगाव यांच्याकडे लेखी तक्रार देऊन बेजबाबदार ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा (कलम ३०४-अ) गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. १३ ऑगस्ट रोजी स्मरणपत्रही दिले. परंतु दोन महिने उलटूनही ग्रामीण पोलीस स्टेशन, खामगाव यांनी साधा गुन्हा दाखल करण्याची तसदी घेतली नाही. ८ सप्टेंबर रोजी केवळ निवेदनावर शिक्का मारून ठाणे अंमलदारांनी हात झटकले. सर्वसामान्य माणसाने साधी चूक केली तरी तात्काळ गुन्हा दाखल करणारे पोलीस, या ठेकेदाराला का पाठीशी घालत आहेत? या ठेकेदारामागे कोणाचे राजकीय वरदहस्त आहेत? पोलीस आणि बांधकाम विभागाच्या या अभद्र युतीमुळेच एका कुटुंबाचा कर्ता पुरुष हिरावला गेला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही उपोषणकर्ते यांनी दिला आहे.