चावट कंडक्टर; एसटीत बसलेल्या बाईला मारत होता धक्क्यावर धक्के! व्हिडिओ काढण्याचीही दिली धमकी... बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेशी गैरवर्तन व धक्काबुक्की केल्याप्रकरणी संबंधित बस वाहकाविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ मे रोजी मोताळा बसस्थानकानंतरच्या प्रवासादरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मलकापूर येथील ३१ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या मलकापूरहून वैजापूर येथे जाण्यासाठी एसटी बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान संबंधित वाहकाने वारंवार अंगाला धक्के देत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. “व्यवस्थित बसा, धक्के मारू नका,” असे सांगूनही त्याने वर्तनात बदल केला नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
महिलेने विरोध दर्शवल्यानंतरही संबंधित वाहकाने “प्रवासात धक्काबुक्की होतच असते,” असे सांगत प्रकार किरकोळ ठरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच व्हिडिओ काढल्याची धमकी देत संभाजीनगर येथे येण्यास सांगितल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून संबंधित एसटी वाहकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अमोल खराडे व प्रमोद साळोक करीत आहेत.