प्रश्नाचे उत्तर न आल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची अमानुष मारहाण! जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार; शिक्षकावर गुन्हा दाखल; पिंपळगाव राजा येथील घटना, जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक रवींद्र चिम हे पवन इंगळे या विद्यार्थ्याला मागील अनेक दिवसांपासून वारंवार मारहाण करीत होते. काही महिन्यांपूर्वीही शिक्षकाने पवनला बेदम मारहाण केली होती. त्या वेळी पवनच्या कानातून रक्तस्राव झाला होता. मात्र, त्या घटनेनंतर काही स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून पालकांची शिक्षकाकडून माफी मागवून घेतली होती. भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, अशी ग्वाहीही संबंधित शिक्षकाने दिली होती.
तरीदेखील, त्यानंतरही विद्यार्थ्यावर अत्याचार सुरूच राहिल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शनिवारी सकाळी शाळेतून घरी परतल्यानंतर पवन इंगळे याला अचानक चक्कर येऊन तो जमिनीवर कोसळला. घाबरलेल्या आई-वडिलांनी विचारणा केली असता, पवनने शाळेत शिक्षकाकडून झालेल्या मारहाणीची संपूर्ण हकीकत सांगितली.
या प्रकारानंतर संतप्त पालकांनी तात्काळ पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून आरोपी शिक्षक रवींद्र चिम (रा. जळका भडंग) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पालकांची लेखी फिर्याद व वैद्यकीय अहवालाच्या आधारे पिंपळगाव राजा पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सध्या जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे पालक वर्गातून संताप व्यक्त होत असून, शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.