डोंगरखंडाळ्यात बालविवाह! प्रशासनाचा हस्तक्षेप; नवरीला नवरदेवाकडे पाठवलेच नाही; बुलढाणा आणले अन्....

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :करवंड येथील १५ वर्षीय मुलीचा बालविवाह ३० एप्रिल रोजी डोंगरखंडाळा येथे पार पडल्याची माहिती चाइल्ड लाइनला प्राप्त झाली होती. प्रशासनाने त्यावर तातडीने हस्तक्षेप करून कारवाई केली आहे.

ग्रामसेवक व बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, तसेच बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या समन्वयाने संबंधित बालिकेला बाल संरक्षण समितीसमोर हजर करण्यात आले. चौकशीदरम्यान तिच्या म्हणण्यानुसार विवाह पार पडल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांना पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. बालिकेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिला सध्या वन स्टॉप सेंटर, बुलढाणा येथे तात्पुरत्या निवाऱ्यासाठी ठेवण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हाधिकारी व जिल्हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांच्या निरीक्षणात पार पडली. या कारवाईत पोलिस निरीक्षक गजानन कांबळे, चाइल्ड लाइनचे समन्वयक शेख सोहेब, तसेच ग्रामविकास अधिकारी श्री. सदावर्ते यांचा सक्रिय सहभाग होता. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य बालविवाहांवर लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वीच दिले होते. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क होते.