गर्भवती राहिल्यानंतर बालविवाह उघडकीस;
पती, सासरा
व वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल..!
Sep 18, 2025, 12:36 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :सोळावर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याचे प्रकरण ती गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आले. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी पती, सासरा आणि वडिलांविरुद्ध बलात्कार, पोक्सो व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावातील अल्पवयीन मुलीचा नातेसंबंधातीलच २० वर्षीय युवकासोबत सहा महिन्यांपूर्वी एप्रिल महिन्यात गुजरातमधील कोकणगाव येथील मंदिरात बालविवाह लावण्यात आला होता. लग्नानंतर मुलगी मोताळा तालुक्यातील एका गावात सासरी राहू लागली. पतीसोबत शारीरिक संबंध आल्यानंतर ती गर्भवती राहिली.
दरम्यान, रक्षाबंधनाच्या सणाला ती माहेरी गेली असता किरकोळ वाद झाला. यावेळी गावातील एका सुजाण तरुणीने तिला बुलढाणा येथील बाल कल्याण समितीसमोर हजर केले. विचारणा केली असता तिने लग्नाविषयी माहिती दिली. नंतर तिला ‘सखी वन स्टॉप सेंटर’मध्ये ठेवण्यात आले. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर मुलीच्या जबाबावरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी पती सागर, वडील गोविंद आणि सासरा चंद्रसिंग यांच्याविरुद्ध बीएनएस कलम ६४ (१), ६४ (२), बालविवाह प्रतिबंधक अधिनियम व पोक्सो कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. पुढील तपास पीएसआय राजेंद्र कपले करीत आहेत.