किरकाेळ वादातून चिखलीत चिकन विक्रेत्यांमध्ये राडा; लाठ्या काठ्यांनी मारहाण
पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून मिटवले प्रकरण...
Oct 30, 2025, 19:31 IST
या घटनेमुळे गजबजलेल्या आठवडी बाजारात तणाव निर्माण झाला हाेता. पाेलीसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने तणाव निवळला.
चिखली येथील आठवडी बाजारात रस्त्याच्या दुतर्फा चिकन विक्रेते आपली दुकाने थाटतात.या चिकन विक्रेत्यांच्या दाेन गटांत ३० ऑक्टाेबर राेजी दुपारी १२ वाजता वाद झाला व तुफान राडा झाला.
२८ ऑक्टोबरला पार पडलेल्या एका लग्नसमारंभातील किरकाेळ वादाची पृष्ठभूमी या राड्यामागे आहे. दुपारी हा वाद पुन्हा उफाळून आला आणि दोन्ही गट रस्त्यावरच आमनेसामने आले. काही क्षणांत दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांवर तुटून पडले, लाठ्या-काठ्या व मिळेल त्या साधनाने मारहाण सुरू झाल्याने संपूर्ण बाजार परिसरात गाेंधळ उडाला.
सर्वत्र पळापळ झाली.
रस्त्यावर भाजीपाला व इतर साहित्य विक्रेत्यांची पुरती धांंदल उडाली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संग्राम पाटील चमूसह घटनास्थळी दाखल झाले व हस्तक्षेप केला. त्यामुळे, परिस्थिती नियंत्रणात आली.