‘सीसी टिव्ही कॅमेऱ्यामुळे’मुळे पातोंडा-पेडक्यातील दगडफेकीला ब्रेक; ठाणेदार किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनात बसविले कॅमेरे...!

 
खामगाव (भागवत राऊत: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पातोंडा-पेडका गावात गेल्या चार-पाच दिवसांपासून काही ठराविक टिनपत्र्याच्या घरांवर छोटे-मोठे दगड भिरकावले जात होते. नेमके दगड भिरकावतो तरी कोण? या प्रश्नामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे या दगडफेकीला पूर्णविराम मिळाला आहे.
गावकऱ्यांच्या माहितीनुसार, पातोंडा-पेडका परिसरात मागील चार ते पाच दिवस रात्रंदिवस ठराविक घरांवर थोड्या-थोड्या वेळाने दगड भिरकावले जात होते. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि काही लोकांची चौकशीही केली. त्यानंतर ठाणेदार तावडे यांनी घटनास्थळी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या.

गेल्या दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत पातोंडा (पेडका) यांच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. सीसीटीव्ही बसवल्यानंतर दगडफेकीच्या घटना पूर्णपणे थांबल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, दगड भिरकावणारा व्यक्ती हा गावातीलच असल्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा उलगडा लवकरच होईल, असा विश्वास ठाणेदार किशोर तावडे यांनी व्यक्त केला आहे.