पारखेड फाट्यावर गुटख्याने भरलेला कंटेनर पकडला; ५०.३५ लाखांचा एवज जप्त !
Sep 5, 2025, 10:39 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गुटखा घेवून जात असलेला कंटेनर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारखेड फाट्यावर ३ सप्टेंबर राेजी पकडला. पथकाने यावेळी ५० लाख ३५ हजार रुपयांचा एवज जप्त केला आहे. तसेच या कारवाईत कंटेनर चालकास अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मा. निलेश तांबे यांच्या आदेशानुसार व पोनि. सुनिल अंबुलकर (स्थानीक गुन्हे शाखा, बुलढाणा) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत नांदूरा–खामगाव रोडवरील पारखेड फाट्यावर सापळा रचण्यात आला. गुजरात राज्यातून खामगाव शहराकडे गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कंटेनर थांबवून तपासणी करण्यात आली.या कंटेनरमद्ये तब्बल २५ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा गुटखा हाेता.
तसेच कंटेनर असा ५० लाख ३५ हजार रुपयांचा एवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी रामराज दुल्हारे (वय 48 वर्षे, रा. फतेपूर, उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम 274, 275, 328 सह अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 26 व 59 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा व बुलढाणा अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोउपनि. अविनाश जायभाये, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, शेख चांद, गणेश पाटील, पोकॉ. गजानन गोरले व चापोकॉ. निवृत्ती पुंड यांनी सहभाग घेतला.