मलकापूर पांग्रा येथे तुरीच्या शेतात केली गांजाची लागवड; १२. ५२ लाखांचा एवज केला जप्त, एकास अटक ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई !

 
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : साखरखेर्डा पोलीस ठाणे हद्दीतील मलकापूर पांग्रा शिवारात तुरीच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत सुमारे १२ लाख ५२ हजार १०० रुपये किमतीचा गांजा जप्त करून एका आरोपीस अटक केली आहे.या कारवाईत मादक पदार्थ गांजाची ओलसर झाडे वजन ७६ किलो ६ ग्रॅम (किंमत ११ लाख ४० हजार ९०० रुपये) तसेच सुकलेली गांजाची झाडे वजन ५ किलो ५६० ग्रॅम (किंमत १ लाख ११ हजार २०० रुपये) असा एकूण ८१ किलो ६२० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक  बुलढाणा व खामगाव, उपविपोअ देऊळगाव राजा यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. 
प्राप्त माहितीनुसार, मलकापूर पांग्रा येथील गट क्रमांक ५०६ मधील तुरीच्या शेतात गेल्या अनेक दिवसांपासून गांजाची लागवड करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे  १८ डिसेंबर रोजी दुपारी पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे, पोलीस हवालदार दिगंबर कपाटे, गजानन दराडे, वनीता शिंगणे, विजय वारूळे, दीपक वायाळ, मंगेश सनगाळे, मनोज खर्डे व समाधान टेकाळे यांच्या पथकाने छापा टाकला.महसूल कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून सुधाकर संपतराव गायकवाड (वय ६५, रा. मलकापूर पांग्रा) यांच्या तुरीच्या शेतातून वरीलप्रमाणे गांजा जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीस अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे हे करीत आहेत.