जुना वाद मिटविण्याच्या बहाण्याने बोलावून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ! 

 
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  जुना वाद मिटविण्याच्या बहाण्याने बोलावून एका तरुणासह त्याच्या आईला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अनिकेत परमेश्वर जाधव (वय २९, रा. त्रंबक नगर, देऊळगाव राजा) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये रामेश्वर दत्ता पवार, चेतन रामेश्वर पवार, श्रीकांत रामेश्वर पवार व अर्चना रामेश्वर पवार (सर्व रा. देऊळगाव राजा) यांचा समावेश आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात जुना वाद असून तो सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. हा वाद मिटविण्याच्या बहाण्याने आरोपींनी फिर्यादीस सिंदखेड राजा रोडवरील बाळू मामा हॉटेल येथे बोलावले. तेथे ‘कोर्टातील केस मागे घेणार का?’ अशी विचारणा करत आरोपी रामेश्वर पवार याने काडीने फिर्यादीच्या डाव्या बरगडीवर व पाठीवर मारहाण केली. चेतन पवार याने हातातील गजाने पाठीवर मारहाण केली, तर श्रीकांत पवार यानेही काडीने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपी रामेश्वर पवार याने फिर्यादीच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी अर्चना पवार हिनेही फिर्यादीच्या आईचे केस धरून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी फिर्यादीवरून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 296, 115(2), 351(2), 351(3), 3(5) अन्वये कायमस्वरूपी एन.सी. दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनात देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.