भरधाव बसची दुचाकीस धडक; चिखली येथील तलाठीचे वडील जागीच ठार; मेहकर फाट्यावर घडला अपघात; वाहतुक पाेलिस नियुक्त करण्याची मागणी..!

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :भरधाव बसने दुचाकीस धडक दिल्याने चिखली येथील तलाठीचे वडील जागीच ठार झाले. ही घटना १३ सप्टेंबर राेजी सकाळी चिखली शहरातील मेहकर फाटा येथे घडली. गणेश दत्तुगीर गिरी (वय ६०, रा.सायळा, ता. सिंदखेड राजा) असे मृतकाचे नाव आहे. 

चिखली येथील तलाठी विनाेद गिरी यांचे वडील गणेश गिरी हे आपली दुचाकी क्रमांक एमएच २८ बीयू ०५९३ ने शनिवारी सकाळी चिखलीकडे येत हाेते. दरम्यान, भरधाव एसटी बस क्रमांक एमएच ४० एन ९१३३ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये गणेश गिरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.माहिती मिळताच चिखली पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.या प्रकरणी पुढील तपास चिखली पाेलीस करीत आहेत. 
मेहकर फाट्यावर वाढले अपघात 
चिखली शहरातील मेहकर फाट्यावर गत काही दिवसांपासून अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळे, या परिसरात वेगमर्यादा लागू करून वाहतुक पाेलिस नियुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.